शुक्रवार, १५ जुलै, २०११

दत्त दिगंबर दैवत माझे

दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विलासे ॥धृ॥

अनुसूयेचे सत्य आगळे । तीन्ही देवही झाली बाळे
त्रैमुरि अवतार मनोहर । दीणोध्दारक त्रिभुवनी गाजे ॥१॥

तीन शिरेम कर सहा शौभती । हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरी, पायी घडावा । भस्मविलोपित कांती साजे ॥२॥

पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ति । आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती । हळू हळू सरते मीपण माझे ॥३॥

ऐरणीच्या देवा

ऐरणीच्या देवा, तुला ठिणगि ठिणगि वाहुं दे
आभाळागत माया तुजीम आम्हांवरी ऱ्हाउं दे ॥धृ॥

लेनं लेऊं गरिबीचं
चनं खाऊं लोकंडाचं
जिनं व्होवं अबरूचं

किरपा तुजी, भात्यांतल्या सुरासंगं गाउं दे! ॥१॥

लक्शिमीच्या हातांतली
चवरि व्हावी वरखाली
इडा-पिडा जाइल आली

धनी मातुर, माजा देवा, वाघावानी असूम दे! ॥२॥

सूक थोडं दुक्क भारी,
दुनिया ही भाली-बुरी,
घाव बसंल घावावरी,
सोसायला, झुंजायला, अंगिं बळ येऊं दे ! ॥३॥

अमृताहुनि गोड नाम तुझे देवा

अमृताहुनि गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा
मन माझे केशवा कां बा ने घे का बान घे ॥



सांग पंढरीराया काय करुं यासी
कां रूप ध्यानासी न ये तुझे ॥१॥



कीर्तनी बैसता निद्रे नागविले
मन माझे गुंतले विषयसूखा ॥२॥



हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति
नये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥३॥

आनंदाचे डोही आनंद तरंग

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदची अंग आनंदाचे ॥धृ॥



काय सांगू झाले कांहिचिया बाही
पुढे चाले नाही आवडीने ॥१॥



गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥



तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला ॥ ३ ॥

विठ्ठल हा कितवा अवतार?

विठ्ठल हा कितवा अवतार?


विष्णुभगवानांनी घेतलेल्या दशावतारांची नांवे सर्वांनाच
तोंडपाठ असतात. त्यामधील मत्स्य, कूर्म आणि वराह हे पहिले तीन अवतार
प्राणीवर्गांत घेतलेले आहेत. त्यांच्याबद्दल सुसंगत अशी फारशी माहिती सर्वांना
ठाऊक नसते. भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण करून त्याने
हिरण्यकश्यपु राक्षसाला ठार मारले आणि बटु वामनाच्या वेषात येऊन महाबळीराजाला
पाताळात गाडले. एवढी कामे करण्यापुरतेच श्रीविष्णूने हे दोन अवतार घेतले आणि
कार्यभाग संपताच ते पुन्हा अदृष्य होऊन गेले. अशा रीतीने त्यांच्या पहिल्या
पांच अवतारांमधील संपूर्ण जीवनाची कथा सामान्यांना ज्ञात नसते. त्यानंतरचे
परशुराम, रामचंद्र आणि श्रीकृष्ण या तीन अवतारांबद्दल अनेक आख्याने ऐकलेली
असतात. या अवतारांमधील त्यांचे आईवडील कोण होते, त्यांचे बालपण कसे गेले, मोठे
झाल्यावर त्यांनी कोणते जीवितकार्य केले वगैरेची मात्र खूप सविस्तर माहिती
बहुतेक लोकांना ठाऊक असते. शेवटचे दोन अवतार बुद्ध आणि कल्की यांच्याबद्दल
मात्र थोडा संभ्रम आहे.

दहावा कल्की अवतार कधी होणार आहे कोणास ठाऊक? तो होऊन गेला आहे असेही कांही लोक
समजतात, पण ‘विष्णूचा अवतार’ म्हणून ओळखला जावा एवढा मोठा महापुरुष कांही
अलीकडच्या काळात होऊन गेलेला दिसत नाही. सर्वसाधारणपणे गौतम बुद्धालाच
‘विष्णूचा नववा अवतार’ मानले जाते. पण पंढरपूरचा विठ्ठल हाच ‘बुद्ध’ नांवाचा
नववा अवतार आहे असे समजणारे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. हा समज कधी आणि कुठे
निर्माण झाला आणि कोठपर्यंत पसरला ते माहीत नाही, पण मी तो लहानपणीच ऐकला होता
आणि इतिहासाच्या पुस्तकातून गौतमबुद्धाची ओळख होण्यापूर्वी मी ही तसेच समजत
होतो. सह्याद्री वाहिनीवरील विठ्ठलाची माहिती देणारा एक बोधपट काल पाहिला
त्यांतसुद्धा असेच विधान केलेले दिसले. त्याबद्दल थोडे स्पष्टीकरणसुद्धा दिले
गेले.


भक्त पुंडलीकावर प्रसन्न होऊन भगवान विष्णु त्याला भेटायला त्याच्या पंढरपूर
येथील जागी आले. नेमका त्या वेळेस तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत गर्क होता,
म्हणून त्याने विष्णूच्या दिशेने एक वीट भिरकावून देऊन तिच्यावर थोचा वेळ उभे
रहायला सांगितले. पुंडलीकाला पुरसत मिळताच त्याने विष्णूला वंदन करून त्याची
क्षमा मागितली आणि त्याने कशासाठी येणे केले ते विचारले. विष्णूने आपण
त्याच्यावर प्रसन्न झालो असल्याचे सांगून कोणतेही वरदान मागायला सांगितले, पण
“आपण आपल्या मातापितरांच्या सेवेत पूर्णपणे संतुष्ट आहोत, आपल्याला आणखी कांही
नको” असे पुंडलीकाने सांगितले. “स्वतःसाठी कांही नको असल्यास इतरांसाठी माग”
असे म्हणताच “देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा” असे
मागणे त्याने मागितले आणि देवाने “तथास्तु” म्हंटले. तोच त्याचा पुढचा अवतार
समजायचा कां नाही यावर दुमत होऊ शकते.

‘अवतरणे’ म्हणजे वरून खाली येणे एवढा अर्थ घेतला तर विठ्ठल हा सुद्धा एक
‘अवतार’ ठरू शकतो, पण या अवतारात त्याने त्यापूर्वीच्या परशुराम, रामचंद्र व
श्रीकृष्ण यांच्यातल्याप्रमाणे मानवी मातापित्यांच्या घरी जन्म घेतलेला नाही.
गौतमबुद्धाने मात्र ‘सिद्धार्थ’ या नांवाने मनुष्यजन्म घेतला होता हा एक फरक
आहे. विठ्ठलाच्या नांवाला बहुधा शास्त्रपुराणांचा आधार नसावा. विष्णूच्या
दशावतारांच्या यादीत त्याचे नांव नाही तसेच केशव, नारायण, माधव इत्यादी
त्याच्या ज्या चोवीस नांवांना पूजाविधीमध्ये सारखा नमस्कार केला जातो त्यातही
विठ्ठल हे नांव नाही. इतकेच नव्हे तर विष्णूसहस्रनामांत देखील त्याचा समावेश
नाही. गौतमबुद्धाचा आहे की नाही ते माहीत नाही, पण विठ्ठलाच्या नांवाला
शास्त्रपुराणांची मान्यता मिळालेली होती असे दिसत नाही.

विठ्ठल आणि गौतमबुद्ध या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे दोघांनीही
कुठल्या दैत्याचा संहार वगैरेसारखी हिंसा केलेली नाही. विष्णूच्या हातात नेहमी
सुदर्शनचक्र, शंकराकडे त्रिशूळ किंवा श्रीरामाकडे धनुष्यबाण असतात, पण
पांडुरंगाच्या हातात कोणतेही शस्त्र नसते. दोन्ही हात कंबरेवर ठेऊन तो शांत
मुद्रेने उभा असतो. गौतमबुद्धाने तर क्षत्रियधर्माचा त्याग करून अरण्यवास
पत्करला आणि विश्वबंधुत्वाचा उपदेश जगाला केला. विठ्ठलाच्या भक्तांनी म्हणजेच
सर्व संतांनीसुद्धा आपसातील प्रेम वाढवण्याचाच संदेश सगळ्या लोकांना दिला.
विठ्ठलाने त्यांना परोक्ष अपरोक्ष रूपाने सतत सहाय्य केले असल्याच्या आख्यायिका
आहेत. “देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा” ही मागणी अशा
रीतीने पूर्ण होतांना दिसते.

आजच्या काळातील बौद्धधर्मीय लोक आपला ‘धम्म’च वेगळा मानतात आणि चीन, जपान,
श्रीलंका यासारख्या परदेशातून आलेले भिख्खू त्यांच्या धार्मिक विधींचे संचलन
करतांना दिसतात. गौतमबुद्धाला श्रीविष्णूचा अवतार मानणे या धम्मपंडितांना कितपत
मान्य आहे कोणास ठाऊक? तसे नसेल तर कदाचित आणखी कांही वर्षांनी तरी विष्णूच्या
दशावतारातील नवव्या अवताराची वेगळी ओळख करावीच लागेल.

गुरुवार, १४ जुलै, २०११

वनवासी पांडुरंग

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा !!
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिका भेटी परब्रम्ह आलेगा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा !



अखंड हिंदुस्थानाच्या उद्धारासाठी पुंडलिका भेटीसाठी आलेले परब्र : म्ह शेकडो वर्षे पंढरपूरच्या पवित्र नगरीत कटेवर हात ठेवून भक्ताचा उद्धार करत आहे . इतका भक्तीचा आणि भक्ताचा महापूर पंढरपूरशिवाय इतर कोणत्या नगरीत होत असेल , असे वाटत नाही . पण या दु : खाच्या भवसागरातून सगळ्यांना सोडवणारा पांडुरंगाचा सासुरवास कधी संपणार आहे , या बाबतीत पराब्राम्हाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच आहे .
पांडुरंगभेटीची आर्तता लागली म्हणून पंढरपूरला जायचं ठरवलं . रात्रभर प्रवास करून पहाटे पंढरपूरच्या पवित्रनगरीत पोचलो . समस्त विश्वाच्या उद्धारासाठी निर्मळ वाहणाऱ्या चंद्रभागेत आमची पापे विसर्जित केली , ते पवित्र उदक मस्तकी घेताच क्षणार्धात पाप नाश झाले पण एक वेगळीच विषण्णता मनामध्ये दाटून आली . सगळ्यांना पवित्र करणाऱ्या चंद्रभागेच्या उदरातून कुठेतरी करुणामय स्वर ऐकू येत होता . अमावस्येच्या छायेत चंद्र असल्याने त्याचा प्रकाश फार क्षीण होता . अंधाराच्या उदरामधून मार्ग काढत चंद्रभागेचा प्रवास सुरू होता . नदीच्या किनाऱ्यावर प्रकाश यावा म्हणून कोणत्याही दिव्यांची वगैरे उपयोजना केलेली नव्हती . आलेल्या यात्रेकरूंना आपल्याच गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशाचा आधार घ्यावा लागत होता . नदीकाठीच बऱ्याच लोकांनी प्रातर्विधी उरकल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती . त्यातून मार्ग काढत आम्ही भक्त पुंडलिकाच्या मंदिरापर्यंत पोहचलो . पहाटेचे चार वाजले होते . तिथे पंचवीस एक लोकांची रांग होती . पण ती लवकर पुढे का सरकत नाही या माझ्या संभ्रमावस्थेचे उत्तर आत गेल्यावर मिळाले . पुंडलिकाविषयी जराही भक्ती आणि आस्था असण्याची शक्यता नसणारी दोन माणसे पुजाऱ्याच्या वेशात आत उभी होती आणि येणाऱ्या प्रत्येकाकडून पैसे मागत होते . आमच्यापैकी एकाचा हात धरून त्याची आणि भक्त पुंडलिकाची इच्छा नसताना त्याच्याकडून संकल्प सोडून घेतला . आईचे नाव काय , वडिलांचे नाव काय असे काहीतरी प्रश्न विचारून १५१ रुपये टाका असा सज्जड दमही भरला . काही कळण्याच्या आतच मागून येणारे लोक ओरडायला लागले . माझ्या सहकाऱ्यांनी इच्छा नसताना १५१ रुपये त्या पुजाऱ्याच्या पोटी वाहून तिथून काढता पाय घेतला . त्यातले किती पैसे भक्त पुंडलिकाच्या मंदिराला वापरण्यात येतील हा प्रश्न मनात कायम ठेवून .
थोडेच अंतर चालून आम्ही पांडुरंगाच्या दर्शनासाठीच्या मुख्य रांगेपर्यंत पोहोचलो . फुले विकणाऱ्या पोरांनी गराडा घातला . ' आमच्याकडून घ्या , आमच्याकडून घ्या ' चा गजर चालू झाला . त्यातल्या दोघां - तिघांकडून फुलांच्या माळा घेतल्या आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पादत्राणे त्यांच्या हवाली करून रांगेच्या इमारतीकडे जाऊ लागलो . तेवढ्यात सुरक्षिततेचा प्रश्न म्हणून एका पोलिसाने आमची तपासणी सुरू केली . बाकी काही न शोधता तो फक्त सगळ्यांचे मोबाइल तपासत होता . मला मोबाइल आहे का , असे त्याने विचारले आणि मी हो म्हणताच तो ठरल्याप्रमाणे अंगावर खेकसला . एवढंही कळत नाही का , जा निघा बाहेर . मोबाईल ठेवून या तिकडे . भक्ताचा उद्धार करणाऱ्या पराब्रम्हाच्या पहिल्याच पायरीवरची ही उद्धट खाकीगिरी मनाला त्रास देऊन गेली . समोरच मोबाइल ठेवण्याचे एक दुकान होते . प्रत्येक मोबाइलचे दहा रुपये याप्रमाणे आम्ही पाच मोबाइल ठेवले आणि दर्शनाच्या रांगेत येऊन पांडुरंग भेटीची आर्ततेने वाट पाहू लागलो . आतापर्यंत सकाळचे सहा वाजले होते . पांडुरंगाच्या नगरीत भक्ताचा महासागर पसरला होता . भक्त प्रवासाचा , गैरसोईचा कुठलाही अविर्भाव चेहऱ्यावर न आणता पांडुरंग नाम घेण्यात तल्लीन झाले होते . ' बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल , ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय ' या गजराच्या अखंड माळा जणू विणल्या जात होत्या . ' पाउले हळू हळू चाला , मुखाने पांडुरंग बोला ' असा आमचा प्रवास दर्शनाच्या रांगेसाठी तयार केलेल्या इमारतीमधून सुरू होता . खरंतर त्या दिवशी एकादशी होती म्हणजे वैष्णवांसाठी पर्वणी होती , पण मंदिर समिती हे साफ विसरल्याचे जाणवत होते . त्या रांगेसाठीच्या संपूर्ण इमारतीत कचरा साठलेला होता . ते झाडण्याचे कष्ट कोणीही घेतलेले नव्हते . सगळीकडे लोकांनी थुंकून ठेवलेल्या भिंती धुतल्या जाण्याची वाट पाहात थकून गेल्या होत्या . स्वच्छतागृहामध्ये गेल्यावर आपणच अस्वच्छ होऊ या भीतीने तिकडे कोणीच फिरकत नव्हते . रांगेच्या इमारतीच्या नशिबी बांधल्यानंतर आजतागायत रंग आलेला दिसत नव्हता आणि होता तो रंग बेशरम प्रशासनामुळे कधीच चैतन्य हरवून बसला होता . खरंतर आत्मचैतन्याचा भान देणाऱ्या या पांडुरंगाच्या नशिबीही चैतन्य गमावलेली माणसं का आली , हा प्रश्न मनाला सहज स्पर्श करून गेला . रांग बरीच मोठी होती . दर्शनासाठी निदान ४ - ५ तास लागणार होते . पण कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती . मध्येच कुठे तरी मोरीसारखी चौकडी आणि कुठेतरी सार्वजनिक नळ असावा असा एक बेवारस नळ . ज्याकडे बघून तहान काय , पण जगायची इच्छाही उडून जावी , अशी अवस्था होती . भक्तांना शुद्ध , गार पाणी पाजण्याची इच्छा आणि कुवत मंदिर समितीमध्ये आणि इतर संस्थांनामध्ये कोट्यावधी रुपयांचे गुप्त दान करणाऱ्या कोणतच का नाही , याचे उत्तर मिळाले नाही . चार तासांचा रांगेतला प्रवास संपून मुख्य मंदिरात जाण्याच्या गॅलरीतून जात असताना तिथे मंदिर समितीचे लोक टेबले मांडून खुशाल पावत्या मागत बसले होते . आमच्यातल्या एकाने त्यांना प्रश्न केला , का हो या पैशाच करता काय आज एकादशी आहे . इथे साधे झाडलेलेही नाहीए . आता यावर तो पगारी माणूस काय बोलणार ? दोन मिनिटे शांत बसून नंतर त्यालाच या गोष्टीची लाज वाटली असावी , म्हणून तो तिथून ते पावती पुस्तक घेऊन अदृश्य झाला . अजून इथेही लाज वाटणारी माणसं आणि प्रवृत्ती शिल्लक आहे हा विचार उगीच मनाला आधार देऊन गेला . पुन्हा मंदिराच्या दिशेनं वाटचाल सुरू केली . मुख्य गाभाऱ्यात पोहचलो . पांडुरंगाचे दर्शन लांबूनच घडता संपूर्ण शरीरातून जणू विजेचं चैतन्य जाणवू लागलं आणि त्या पवित्र भूमीवर समर्पित होण्याच्या आर्ततेने नकळतपणे डोळ्यातून दोन थेंब प्रवासी झाले . पुढची पावले कशी पडली आठवत नाही . नजर त्या श्रीचरणी तल्लीन झाली होती . पण या पवित्र नात्यामध्ये क्षणार्धातच पुन्हा विघ्न आलं . मंदिरातले पुजारी आणि सुरक्षारक्षक बेशिस्तपणे भक्तांना लोटत होते . पांडुरंगाचं नशीब की तो थोडा लांब उभा होता नाहीतर यांनी त्यालाही लोटायला कमी केलं नसतं . तेथील पुजाऱ्यांना भक्तीभाव , भक्त , आणि पांडुरंग यांच्याशी काहीच घेणं नव्हतं . त्यांचा लक्ष होता फक्त गरम खिशांकडे . येणाऱ्या प्रत्येकाला दक्षिणा टाका असं ते मोठ्या अधिकारवाणीने सांगत होते . त्यांनी मलाही पकडले आणि १०१ दक्षिणा टाका असं फर्मान सोडलं . मी दक्षिणापेटीत टाकली आहे , असे उत्तर दिल्यानंतर त्यांचा संताप अनावर झाला . क्षणात चेहरा बदलला आणि मला धक्का मारत चला , व्हा पुढे म्हणत त्याने मनातल्या मनात एक शिवीशी मला हासडली . तिकडे भक्तांच्या उद्धारासाठी अठ्ठावीस युगे विटेवर उभे राहण्याचा शब्द दिल्याने पराब्राम्हाला तिथे थांबणं अनिवार्य होतं . भक्तांच्या माथ्याच्या स्पर्शाने त्याचे चरणकमल कमालीचे झिजले होते , पण तरीही भक्तउद्धाराचा हट्ट तो सोडायला तयार नव्हता . त्यांच्या एका स्पर्शाने आयुष्य उद्धरून जाते . ' ब्रम्ह सत्या जगन मिथ्या ' या उक्तीचा अर्थ कळू लागतो . त्याला बघितला की मग संपूर्ण आयुष्य मंगलमय होऊन जाते . कसलीही आस्था राहत नाही . अशा ह्या विश्वाकार्त्याच्या सतत सान्निध्यात राहूनही आपले आयुष्य पवित्र करून न घेऊ शकलेल्या त्या पैसे मागणाऱ्या पुजाऱ्यांचा मला राग येण्यापेक्षा कीवच आली .
रुक्मिणीच्या दर्शनासाठीही हीच अवस्था . तिथल्या पुजाऱ्याने आमच्यापैकी एकाला प्रसाद म्हणून नारळ दिले . पुढे आल्यावर दाराजवळ दुसरा द्वारपाल उभा होता . त्याने लगेच १०० रुपये मागितले . आम्ही कसले असे विचारण्याआधीच त्याने अतिशय उद्धट भाषेत नारळ काय फुकट नेणार काय असे उत्तर देत आमच्या हातातून नारळ हिसकावून घेतले आणि १०० रुपयांची वाट पाहणाऱ्या इतर नारळामध्ये त्या प्रसादरूपी नारळाला फेकून दिले . अर्थात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानंतर खूप काही मिळालं होतं आणि हो तेवढे कटू अनुभवही . मंदिराबाहेर पडताच प्रसादासाठी लाडू घेण्यासाठी मंदिर समितीच्या दुकानात गेलो . तिथे ४० रुपयांचे लाडू घेऊनही तो महाभाग सुट्टे देण्यास तयार नव्हता . वास्तविक पाहत समोर पैशाचा ढीग लागलेला होता . मी वैतागलो . मगापासून झालेल्या घुसमटीचा सगळा राग त्याच्यावर काढला . मी कोणीतरी साहेब आहे असं समजून तो घाबरला आणि त्याने पटकन सुट्टे पैसे काढले . माझ्यामुळे इतरांनाही त्याने सुट्ट्यासाठी त्रास देणं तेवढ्यापुरता का होईना बंद केलं . प्रसाद घेऊन बाहेर पडलो . पहिले मोबाईल ताब्यात घेतले . ते घेताना तो पोलीस आणि हो दुकानदार यांच ' एकमेकां साह्य करू ' चालले आहे हे माझ्या लक्षात आलं . नंतर पादत्राणांचा शोध सुरू झाला . तो फुले विकणारा तिथे काही दिसायला तयार नव्हता . तेवढ्यात तो कुठून तरी आला आणि म्हणाला , साहेब तुमच्या चपला इकडे ठेवल्या आहेत . माझा माल विकून तर कधीच संपला . पण तुमच्या चपला सोडून कसा जाणार म्हणून थांबलो ... पंढरपूरात पांडुरंग कुणाला तरी कळला आहे एवढे पाहून मन प्रसन्न झाले .
पुढे गाडीकडे जाण्यास निघालो . आता चांगले सकाळचे १० वाजले होते . पण मनातला अंधार अजून दूर होण्यास तयार नव्हता . पोटात चांगलेच कावळे ओरडायला लागले होते म्हणून तेथून पटकन गाडी बाहेर काढली आणि गाडीच्या चाकाबरोबर विचारांनीही गती घेतली की हे असं का ?
सगळा देश प्रगती करतोय , देशातून - परदेशातून पैशाचा ओघ वाहतोय . दर आषाढीला आणि कार्तिकीला लाखो भक्त याच नगरीत येतात . राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पांडुरंगावर एक दिवसापुरता का होईना महापुजेचा अधिकार गाजवून जातात . मग ही अशी अवस्था का ? त्या पांडुरंगाच्या राज्यात त्या पांडुरंगालाच वनवास का ? पांडुरंगाला पहिल्यापासूनच गरिबांचा देव म्हणून संबोधलं आहे . पैशाने मोठा बालाजी आणि भक्ताने मोठा पंढरपूरचा विठोबा पंढरपूरला येणार . सगळेच सामान्य जन असतात . त्यांची फार काही अपेक्षा मुळीच नाही पण ही हेळसांड थांबली पाहिजे . मंदिर परिसरात होणारी दादागिरी मंदिर समितीचे मंदिराच्या दानपेटी व्यतिरिक्त सर्वत्र असणारे दुर्लक्ष किळसवाणे आहे . बाकी ठिकाणी विकासासाठी होणारा करोडो रुपयांचा खर्च पंढरपूरात का होऊ शकत नाही . सरकार मधल्या लोकांना ती आपली जबाबदारीच वाटत नाही का ? खरंतर तिथे खूप काही करण्यासारखं आहे पण कोणीही पुढाकार घेत नाही , मंदिराच्या आसपास जेवणाची उत्तम सोय नाही , मोबाईल , चप्पल ठेवण्यासाठी ठिकठिकाणी मंदिर समितीची सोय नाही , स्वच्छतेच्या नावाने सगळीकडेच बोंब आहे पण यावर कुणीच आवाज उठवताना दिसत नाही . वारकरी संप्रदायातले कितीतरी महाराज या परिसरात आपले स्थान मांडून आहेत पण तेही याकरता कुठे आवाज उठवताना दिसत नाहीत .
मी पंढरपूरला जाणारा नियमित वारकरी नाही . वर्ष - दोन वर्षातून एकदा जाणे होते . हे नेहमीच जाणवत होते . पण आज ते पुन्हा सगळ्यांसमोर मांडावेसे वाटले . बरीच संस्थाने फिरलो पण अशी अवस्था कुठेच नाही . शेगाव संस्थानाने तर सोयी कशा असाव्यात याचा आदर्शच घालून दिला आहे . मग हे पंढरपूरात का होऊ शकत नाही ? पंढरपूर मला कमर्शियल व्हावं असं मुळीच नाही . पण सोयीसुविधांमध्ये सुधारणा होणे चूक आहे का ? माझे मनोगत म्हणून याची एक कॉपी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , गृहमंत्री यांना नक्कीच पाठवणार आहे , त्यामुळे त्यांना काय फरक पडेल माहित नाही . त्यांच्या प्रचंड फाईलच्या ढीगामध्ये पांडुरंगाचा आवाजही दडपला जाईल . असो पांडुरंगाचे खरे भक्त म्हणून त्याला सासुरवासातून सोडवण्यासाठी मी हा प्रयत्न करणार आहे काय सांगावं असाच कुणाच्या तरी प्रयत्नातून सासुरवास करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदे करणाऱ्या ह्या निद्रिस्त सरकारला जाग येईल आणि जगात कल्याणासाठी २८ युगे उभा ठाकलेला हा पांडुरंग काही युगे तरी सासूरवासातून सुटू शकेल , अशी आशा बाळगायला काय हरकत आहे ?

महाराष्ट्राचे आराध्य श्रीविट्ठल

श्रीविट्ठलाची विशेष उपाधी आहे, पांडुरंग. या शब्दाने विद्वानांना चकवा दिला होता. पांडुरंग हे नाव मुळात विट्ठलाची शिव-निदर्शक उपाधी आहे, असाच समज जोप

ासला गेला असला तरी ते तसे नसून ते त्याचे कुळनाम आहे, हे आता स्पष्ट आहे. महाभारतात पौंड्रवंशीय वासुदेव म्हणून राजा होता. तो 'पौंड्रक वासुदेव' या नावाने ओळखला जात होता. तो कृष्णाचा प्रतिस्पधीर् असून त्याला पुढे कृष्णाने ठार मारले. म्हणजे पौंड्रवंशीय राजे स्वत:ला 'पौंड्रक' अशी उपाधी लावत होते, हे यावरून स्पष्ट होते. 'पौंड्रक' या शब्दाचे मराठी सुलभीकरण म्हणजे 'पांडुरंग' होय. 'पौंड्रक' विट्ठलाचेच पुढे 'पांडुरंग विट्ठल' असे सुलभ रूप बनले, कारण तोही पौंड्रवंशीय होता. याचा साधा सरळ अर्थ असा की पौंड्र समाजातील जे पशुपालक, धनगर, कुरुब होते त्या समाजातील विट्ठलनामक आद्य वसाहतकार वा सम्राटाची पशुपालक वेशातील ही मूर्ती आहे.

सातशे वर्षांहून अधिक काळ सामान्यजनांना वेड लावणाऱ्या आणि आपल्या भक्तीचे अजोड गारुड निर्माण करणाऱ्या

पांडुरंग विट्ठलाचे कूळ शोधण्याचा अनेक संशोधकांनी प्रयास केला, त्यातील हा नवा लक्षणीय शोध...



महाराष्ट्राचे आराध्य श्रीविट्ठल हे आजवर रहस्यच बनून गेले होते. विष्णुच्या २४ अवतारांत आणि विष्णु सहसनामांतही न सापडणारा हा एवढे माहात्म्य पावलेला देव कोणता? कोठून आला? पुराणांतरीही त्याचे कोठे चरित्र का येत नाही? असे असंख्य प्रश्न घेऊन संशोधकांनी श्रीविट्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे, आणि कदाचित तो त्यामुळेच अयशस्वी ठरला आहे. खरेतर पांडुरंग, पुंडरिक, पंढरपुर आणि पौंड्रिक क्षेत्र या नामांतच श्रीविट्ठलाचे मूळ चरित्र दडलेले आहे, यावर कोणी विचार केला नव्हता. परंतु श्रीविट्ठल म्हणजे अन्य दुसरे कोणी नसून पौंड्र या प्राचीन पशुपालक समाजातीलच एक महान शिवभक्त होता व त्यालाच आज आपण पांडुरंग विट्ठल म्हणून पुजतो आहोत. भजतो आहोत.

खरेतर संशोधकांनी पंढरपूरच्या पांडुरंग विट्ठलाचे मूळ शोधायचे असेल तर पांडुरंग, पंढरपुर, पौन्ड्रिक क्षेत्र आणि पुंडरिक या शब्दांवर, त्यांच्या व्युत्पत्तींवर सर्वप्रथम विचार करायला हवा होता. श्रीविट्ठलाची सर्वमान्य उपाधी आहे ती म्हणजे पांडुरंग. पांडुरंग या शब्दाने कर्पुरगौर शिवाचा निदेर्श होत असला तरी, विट्ठल हा गौर नसून काळासावळा आहे, त्यामुळे ही उपाधी का, हे कोडेही संशोधकांना पडले होते. त्याला आता विष्णु वा कृष्णाचे रुप बहाल केले गेले असले तरी, ते त्याच्या मूळच्या शैव रुपाचे वैष्णव उन्नयन आहे, असे मत डॉ. माणिकराव धनपलवार व डॉ. रा.चिं. ढेरे यांनी व्यक्त केलेले आहे. तो गोपवेषातील रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढायला गोपवेषात आलेला कृष्णच आहे, अशी संत-भक्तांची श्रद्धा आहे. ज्या पुंडरिकासाठी म्हणून विट्ठलाचे आगमन झाले अशा कथा स्थलमाहात्म्यात येतात, त्या पुंडरिकाची म्हणून जी समाधी आज आहे, ते प्रत्यक्षात शिवालय आहे, हेही डॉ. ढेरंेनी सिद्ध केले आहे. स्थलपुराणात पंढरपूरचा निदेर्श पौन्ड्रिक क्षेत्र म्हणून येतो. एवढेच नव्हे तर या स्थलपुराणांचे नाव 'पांडुरग माहात्म्य' असे आहे, 'विट्ठल माहात्म्य' नव्हे, हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

पौंड्रिक क्षेत्र म्हणून पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेले हे स्थान. पुंडरिक हे शिवालय. पांडुरंग ही विट्ठलाची विशेष उपाधी आणि पंढरपूर हे स्थलनाम यावरून मी शोध घेतला असता एक वेगळेच रहस्य उलगडले गेले, आणि ते असंख्य पुराव्यांवरून सिद्धही होते. 'पांडुरंग' ही उपाधी नसून ते श्री विट्ठलाचे कुलनाम आहे आणि हे क्षेत्र त्याच्याच कुळाने स्थापन केले असल्याने त्याला पौंड्रिक क्षेत्र हे नाव लाभले, एवढेच नव्हे तर पंढरपूर या शब्दाची व्युत्पत्ती पंडरंगे वा पांडरंगपल्ली या कानडी नावात शोधण्याची गरज नसून ती 'पौंड्रिक' या शब्दातच दडली आहे.

पुंडरिक हा शब्द पौंड्रिक या शब्दाचे सुलभीकरण आहे हे उघड आहे. त्यामुळे मुळ 'पौंड्र' कोण होते, या प्रश्नाचा शोध घेणे आवश्यक होते. पौंड्र या एकेकाळच्या पशुपालक, शुद समाजाचे मूळ सापडते ते इसवी सन पूर्व आठव्या शतकातील ऐतरेय ब्राह्माण व महाभारतात. विश्वामित्राच्या १०० मुलांपैकी पौंड्र, औंड्र, शबर, मुतीब इ. मुलांनी दक्षिणेत येऊन राज्ये वसवली, असे ऐतरेय ब्राह्माणावरून दिसते. अन्य आख्यायिकेनुसार पौंड्र, औंड्रादि हे बळीराजाचे पुत्र होते व त्यांनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र व ओडिसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.) येथे सत्ता स्थापन केल्या. हे परंपरेने शुद मानले गेले असून मुळचे पशुपालक होत. पौंड्रांनीही दक्षिण भारतात आपल्या वसाहती केल्या याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत. महाभारत युद्धात पौंड्र हे दुयोर्धनाच्या बाजूने लढले होते.

पंढरपूर हे पौंड्रपूरचे सुलभीकरण आहे हे तर स्पष्टच आहे. दक्षिणेतील तिरुवारुर, चिदंबरम या शहरांची पर्यायनामे पुंड्रपूर अशी आहेत. बंगालमधील पौंड्रांनी पुंड्रपूर येथून राज्यकारभार चालवला होता, असे ह्यु-एन-त्संगने नांेदवून ठेवले आहे व महास्थानगढ येथे या नगराचे अवशेषही आता सापडले आहेत. महाभारतात विदर्भाबरोबरच पांडुराष्ट्राचाही उल्लेख आहे. हे पांडुराष्ट्र पौंड्रांशी निगडित असणार. पौंड्र समाजाने सर्वप्रथम दक्षिण भारतात वसाहती केल्या हे यावरून सिद्ध होते आणि हा काळ औंड्रांच्या (आंध्र सातवाहनांच्याही) पूवीर्चा, म्हणजे किमान इसवी सन पूर्व पाचव्या शतकापूवीर्चा असावा. म्हणजे महाराष्ट्रातील पंढरपूर (मूळ पौंड्रपूर) ही प्राचीन काळातील पौंड्रांची राजधानी होती, हे यावरून स्पष्ट होईल व या क्षेत्राला पौंड्रिक क्षेत्र का म्हटले गेले असावे, हे सहज लक्षात येईल. पौंड्रांच्या स्वामित्वाखालील प्रदेश ते पौंड्रिक क्षेत्र आणि ही पुरातन आठवण स्थलमाहात्म्यांनी स्पष्टपणे जपलेली आहे.

श्रीविट्ठलाची विशेष उपाधी आहे, पांडुरंग. या शब्दाने विद्वानांना चकवा दिला होता. पांडुरंग हे नाव मुळात विट्ठलाची शिव-निदर्शक उपाधी आहे, असाच समज जोपासला गेला असला तरी ते तसे नसून ते त्याचे कुळनाम आहे, हे आता स्पष्ट आहे. महाभारतात पौंड्रवंशीय वासुदेव म्हणून राजा होता. तो 'पौंड्रक वासुदेव' या नावाने ओळखला जात होता. तो कृष्णाचा प्रतिस्पधीर् असून त्याला पुढे कृष्णाने ठार मारले. म्हणजे पौंड्रवंशीय राजे स्वत:ला 'पौंड्रक' अशी उपाधी लावत होते, हे यावरून स्पष्ट होते. 'पौंड्रक' या शब्दाचे मराठी सुलभीकरण म्हणजे 'पांडुरंग' होय. 'पौंड्रक' विट्ठलाचेच पुढे 'पांडुरंग विट्ठल' असे सुलभ रूप बनले, कारण तोही पौंड्रवंशीय होता.

याचा साधा सरळ अर्थ असा की पौंड्र समाजातील जे पशुपालक, धनगर, कुरुब होते त्या समाजातील विट्ठलनामक आद्य वसाहतकार वा सम्राटाची पशुपालक वेशातील ही मूतीर् आहे. तो स्वत: विष्णुही नाही की कृष्णही नाही, पण त्याचे हे गोपध्यान पाहून यादवकाळात विट्ठलाचे वैष्णवीकरण करताना त्याचे गोपवेषधारी कृष्णाशी तादात्म्य साधले गेले, असे स्पष्ट होते. (प्रत्यक्षात पौंड्रवंशीयांचे कृष्णाच्या यदूवंशाशी हाडवैर होते. महाभारत युद्धात पौंड्र हे दुयोर्धनाच्या बाजूने लढले हे वर लिहिलेच आहे.) मूळच्या अवैदिक देवतास्वरूप मानल्या गेलेल्या शुदवंशीयांचे हे वैदिकीकरण अक्षरश: स्तिमित करणारे आहे. असे असले तरी पांडुरंगाचे मूळ अवैदिक स्वरूप त्यांना बदलता आले नाही, म्हणून आपण आज सत्यापर्यंत पोहोचू तरी शकतो.

पौंड्र, औंड्रादि मंडळी शिवभक्त होती. आंध्रात असंख्य शिवमंदिरे आहेतच. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही, कारण येथील मूळ वसाहतकार पौंड्रच होते. पौंड्र राजांनी आपली राजधानी पंढरपुर (पौंड्रपुर) येथे शिवालय स्थापन करणे स्वाभाविकच होते. या मंदिराला पुंड्रिकेश/ पुंडरिक असे संबोधले जाते. पौंड्रांचे जे आराध्य तो पुंड्रिकेश/पौंड्रिकेश म्हणूनच संबोधला जाणार हे उघड आहे, आणि तो तसा संबोधला गेलेलाही आहे. भक्त पुंडरिकाची कथा कोणाही विद्वानाने मान्य केलेली नाही. विट्ठलाच्या पंढरपुरातील प्रकटीकरणाच्या ज्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात, त्या एकमेकांशी विसंगत आहेत. त्र्यंबकेश्वरचे लघुरुप त्र्यंबक जसे होते, तसेच पौंड्रिकेशाचे संक्षिप्तीकरण पुंडरिक झाले हे स्पष्ट आहे. ते नाम कधीही 'विट्ठलेश्वर' नव्हते, याचा दुसरा अर्थ असा की तो शिव केवळ विट्ठल या व्यक्तीचा इष्ट देव नव्हता तर त्याच्या संपूर्ण पौंड्र समाजाचा अधिदेव होता. स्वत: श्रीविट्ठलही अनन्य शिवभक्त असून त्याच्या माथ्यावर शिवलिंग आहे अशी संतांची श्रद्धा आहे, हेही येथे उल्लेखनीय आहे.

विट्ठल या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांनी अनेक तर्क केले आहेत. बिट्टीदेव या राजाच्या नावापासून वा इटल-ब्रमल या जोडदेवतांतून इटल-विट्ठल नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. पण आठव्या शतकातील राष्ट्रकुट राजांच्या कारकिदीर्त पंढरपूरच्या एका 'जयद्विठ्ठ' नामक ब्राह्माणाला जमीन दान केल्याचा ताम्रपट उपलब्ध आहे. म्हणजे तोवर विट्ठ-विट्ठल हे सामान्य नाम बनावे एवढी त्या नामाची प्रसिद्धी आठव्या शतकापर्यंत झालेलीच होती. म्हणजे विट्ठल हा त्याहीपेक्षा पुरातन असून दैवतप्रतिष्ठा प्राप्त करून बसला होता. इटल-ब्रमल हे नंतर कधीतरी त्याच पशुपालक समुदायातून आलेले वीरदेव असावेत. पंढरपुरच्या विट्ठलाशी त्यांचा संबंध दिसत नाही, कारण तो पुरातन आहे. विट्ठलमूतीर् अनादि आहे, अशी संतांची श्रद्धा आहे, आणि ही पुराणता पाहता ती योग्यही आहे. विट्ठल नावाची व्युत्पत्ती अन्यत्र शोधण्यापेक्षा ते आहे तसेच व्यक्तिनाम म्हणून स्वीकारावे लागते. (हे नाव विष्णुच्या २४ अवतारांतही नाही वा विष्णु सहसनामांतही नाही, हेही लक्षात घ्यावे लागते. किंबहुना अन्यत्र कोठेही हे नाव सापडत नाही. पण जेथे जेथे पौंड्रांच्या राजधान्या होत्या, तेथे मात्र विट्ठलाच्या मूर्ती मिळालेल्या आहेत. यावरून विट्ठल या पुराणपुरुषाची महत्ता सिद्ध होते.)

थोडक्यात पौंड्र या महाराष्ट्रातील आद्य पशुपालक समाजाने जी राजधानी केली ती पौंड्रपूर तथा आजचे पंढरपूर. या पौंड्रांचा, जे वर्णव्यवस्थेत पुराणांतरीही शुद मानले गेले, त्या पशुपालक/धनगर/कुरुबांचा सम्राट वा कोणी महान शिवभक्त विट्ठल हा पौंड्रंक (पांडुरंग) विट्ठल. या पौंड्रांचे आराध्य शिवाचे मंदिर ते पौंड्रिकेश तथा पुंडरिक. त्यामुळे पुंडरिक हे शिवालयच पंढरपुरचे मुख्य स्थान असून ११व्या शतकापर्यंत उघड्यावर असलेली विट्ठलाची मूर्ती हे दुय्यम स्थान होते, हे आता लक्षात येईल. शके ११११च्या लेखात विट्ठलदेव नायक या देवगिरीच्या पंढरपूरच्या सामंताने तेथे लहानसे मंदिर बांधले, असे नांेदले आहे. पुंडरिकेश शिवाचे मंदिर त्यापेक्षा पुरातन आहे हे स्पष्ट आहे. आपल्या विस्मृतीत गेलेल्या महानायकाची पूजा तत्पूवीर्ही उघड्यावर होतच होती. त्याच्या मूतीर्साठी मंदिर बनवणारासुद्धा विट्ठलदेवच होता, हेही येथे उल्लेखनीय आहे. दिवंगत महापुरुषांच्या मूर्ती/प्रतिमा बनवण्याची प्रथा औंड्र सातवाहनांनीही पाळली असे दिसते. (नाणेघाटचे प्रतिमागृह.)

थोडक्यात विट्ठलाला वैष्णव मानणे व विट्ठलाला विष्णु-कृष्णरूप मानणे हे अनैतिहासिक आहे, हे यावरून सिद्ध होते. तो पशुपालक समाजाचा पौंड्रवंशीय श्रेष्ठ पुरुष होता आणि महान शिवभक्त होता, हेच काय ते सत्य आहे. परंतु विट्ठलाचे वैदिकीकरण-वैष्णवीकरण करण्याच्या नादात ज्या भाकडकथा निर्माण केल्या गेल्या, त्यामुळे मूळ सत्यावर जळमट पडले होते. पण आता तरी नव्या दृष्टिकानातून त्याकडे पाहावे.